पेन्टींग आणि पोर्ट्रेट या कला प्रकारातील प्रदीर्घ अनुभवाने संपन्न असणाऱ्या डॉ. शीतल बावकर ह्यांनी आपली पदव्यूतर पदवी (एमएफए) संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून घेतली आहे. आरंभी त्या नागपूरातील भवन्स शाळेत कला-शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. विवाहानंतर मुंबईत स्थिरावताना सुरुवातीपासून त्या मुक्त चित्रकार म्हणून कॅनव्हास, रंग आणि कुंचल्याशी संलग्न राहिल्या. याचकाळात त्यांचा पहाडी लघुचित्रशैलीवरील प्रंबंध नागपूर विद्यापीठाने पीएचडीसाठी स्विकारला. त्या नेटच्या परिक्षेतही पात्र ठरल्या. सध्या त्या जे. के. अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड डिझाईन या महाविद्यालयाच्या बीएफए विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
चित्रकला ह्या कलामाध्यमातून व्यक्त होण्याऱ्या शीतल सध्या अमूर्तशैलीकडे वळल्या असल्या तरी आपल्या शैक्षणिक कालावधीत त्या क्रिएटिव्ह पेन्टींगने प्रभावित होत्या. या चित्रकर्तीला व्यक्तीचित्रणात विशेष आवड आहे. तैलरंग आणि अक्रॅलिक रंगांतून कॅनव्हासवर भावविश्व साकारणाऱ्या शीतल यांना जलरंगातील नितळता कागदावर साकारण्यातही आनंद वाटतो. आजवरच्या त्यांच्या एकल आणि सामूहिक चित्र प्रदर्शनातून तसेच अभ्यासदौऱ्यांतील चित्रप्रवासातून याचाच प्रत्यय येतो.