चित्रकला शिल्पकलाविषयक लेखन गेले ४० वर्षे सातत्यानं करणा-या साधना बहुळकर या जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या 1979च्या विद्यार्थिनी.1982 ते 2006 पर्यंत चित्रकला क्षेत्राशी सबंधित नोकरी केली. फिल्म्स डिव्हिजनच्या कार्टुन फिल्म युनिट मधे त्यांनी नऊ वर्षे नोकरी केली. नंतर पार्ले टिळक विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये त्या ड्रॉइंग टीचर होत्या. २००६मधे स्वेच्छा निवृत्ती घेऊन कलाविषयक लेखनाकडे पुन्हा वळल्या.
त्यांच्या लेखनाची सुरुवात शिक्षण संपल्यावर लगेच 1980 मध्ये लोकसत्ता दैनिकात 'रंग-रेषा' या सदराने झाली. त्यात साधना खडपेकर नावानी त्या जहांगिर आर्ट गॅलरीमध्ये होणा-या चित्रकला प्रदर्शनांचं समालोचन लिहित असत. याखेरीज सुरवातीला म टाइम्स, सकाळ, नवशक्ती दैनिकात सदर लेखन केले. २०१२ ते २०१५ च्या दरम्यान 'अंतर्नाद', 'अनुभव', 'मिळून सा-याजणी' इत्यादी नियतकालिकांसाठी सदर लेखन केले. द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, नेहरू सेंटर, ठाणे आर्ट गॅलरी इत्यादी संस्थांच्या कॅटलॉग मधे त्यांचे लेख आहेत. २०११ ते २०२४ पर्यंत त्यांनी लिहिलेल्या लेखांची संख्या सुमारे १००आहे.
चित्र-शिल्पकलेतील प्रकाल्पात्मक व संशोधनात्मक लेखनातही त्यांचा सहभाग आहे. त्यांचे माधव सातावळेकरांवरील चित्रायन हे पुस्तक जानेवारी २००५ मध्ये प्रसिद्ध झालं. *'महाराष्ट्र साहित्य परिषदे'च्या २०१० मधे प्रसिद्ध झालेल्या खंड ७- भाग दुसरा या दस्तऐवजीकरणाच्या प्रकल्पातही सहभागी होत्या. *वाई येथील विश्र्वकोशात भारतीय व पाश्चात्यचित्रकार, शिल्पकारांवर नोंदी लिहिल्या. *२०१३ मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या 'दृश्य कला(चित्र-शिल्प इत्यादी) कोशा'करिता त्यांनी सहसंपादक म्हणून काम केलं. *मार्च २०२१ मधे प्रकाशित झालेल्या ' व्हिजुअल आर्ट ऑफ महाराष्ट्र ' या इंग्लिश एन्सायक्लोपिडीयात त्यांनी लिहिलेल्या सुमारे ११ नोंदींचा समावेश आहे. *मुंबईतील 'एशियाटिक सोसायटीने' २०१५मधे कला विषयासाठी सुरू केलेल्या फेलोशिपच्या त्या पहिल्या मानकरी आहेत. प्रस्तुत फेलोशिपसाठी त्यांनी 'बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार.१८५७-१९५०' हा विषय निवडला होता. *तोच प्रबंध राजहंस प्रकाशनाने पुस्तक रुपाने नोव्हेंबर २०२१मधे प्रसिद्ध केला. हा प्रबंध 'ललित कला अकादमी', दिल्ली हिंदीत पुस्तकरूपाने प्रसिद्ध करणार आहे.
'आर्ट सोसायची ऑफ इंडिया' या संस्थेच्या कार्यकारिणीत त्या २०१५ ते २०२१ अशी सात वर्षे सक्रिय. आताही संस्थेच्या कार्यकारिणीत आहेत. दरवर्षी मराठी, हिंदी, इंग्लिश या तीन भाषांत प्रसिद्ध होणा-या, कलापुस्त्कांचा परिचय देणारी सूची, या संस्थेच्या कॅटलॉग मधे देण्यास 2016पासून त्यांनी आरंभ केला. याप्रमाणेच राज्य-राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मानित चित्रकार शिल्पकारांची नोंद कॅटलॉग मधे घेण्याची प्रथा साधनाताईंनी सुरु केली.
चित्रायन’ या माधव सातवळेकरांवरील पुस्तकाला ‘कोकण मराठी साहित्य’ परिषदेचे पारितोषिक- 2005.
कलावर्त-कलान्यास’या उज्जैनच्या संस्थेकडून चित्रकला लेखनाच्या योगदानाबद्दल ‘राष्ट्रीय वर्णपट सम्मान’-2006.
'बॉम्बे स्कूल परंपरेतील स्त्री चित्रकार.' पुस्तकाला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'कृष्ण मुकुंद' पुरस्कार सप्टेंबर २०२२ मधे देण्यात आला.
याच पुस्तकाला पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा 'प्रबंध एकादशी' समिती पुरस्कृत डॉ हे.वि. इनामदार' पुरस्कार 23 नोव्हेंबर २०२२ मधे मिळाला.
या पुस्तकाला विलेपारले येथील उत्कर्षमंडळाचा 'हेडगेवार' पुरस्कार मार्च २०२२ मध्ये मिळाला.
ग.दि.मा.प्रतिष्ठान तर्फे 'गृहिणी-सचिव-सखी' पुरस्काराने १४ डिसेंबर २०२२ रोजी सन्मानित करण्यात आले.